Type Here to Get Search Results !

वेशीवरची हडळ - काेकणातील भयकथा | Horror Story in Konkan

वेसीवरची हडळ.... (कोकणातील भयकथा)

विषय: भयकथा | श्रेणी: कोकणातील रहस्यमय कथा

रात्री साडे दहाच्या सुमारास गावातले झनके मास्तर आपल्या जुनाट स्कुटरवरून तालुक्यातील गावातून मजल दरमजल गावाच्या दिशेने चालले होते. त्यांची स्कुटर अगदी जुनाट असल्या कारणाने तिला फार स्पीड नव्हता. खेडेगावातील रस्ता म्हटल्यावर इतक्या रात्री चिटकूर पाखरू पण त्या रस्त्याला फिरकत नसे, तसे मास्तर भुताखेताला घाबरण्यातले नव्हते पण रस्ता जंगलामधून असल्याने एखादं रानटी जनावर रस्त्यावर येण्याची शक्यता होती, त्यामुळे मनात थोडी धाकधूक सतत होती. त्यात ही फटफटी कधी दगा देईल याचा भरवसा नाही.

झनके मास्तर भूम गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, मूळचे ते घाटावरचे पण त्यांची बदली इकडे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील भूम या खेडेगावात झालेली, गेल्या तीन वर्षांपासून ते इकडे प्राथमिक शाळेचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. गावातील शाळा फक्त चौथी पर्येंत होती पुढील शिक्षणासाठी मुलांना शेजारच्या बिबवेवडी गावात शाळेसाठी चार किलोमीटर पायपीट करत जावे लागत असे. झनके गुरुजीना त्यांची पत्नी आरती हिच्यासोबत शाळेच्या आवारात शिक्षकांसाठी बांधलेल्या खोलीत रहात, त्यांचे लग्न होऊन सात वर्षे झाली पण मुलबाळ नव्हते.

झनके गुरुजी आज तालुक्याला प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या सभेसाठी गेले होते. सभा संपल्यावर त्यांच्या ओळखीतल्या एका शिक्षकांची तब्बेत ठीक नसल्याने त्यांना बघायला ते त्यांच्या गावी गेले होते. ते शिक्षक तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या एका खेड्यात रहात होते पण गेल्या आठवड्यापासून त्यांची तब्बेत अचानक बिघडली म्हणून ते त्यांना पाहायला गेले त्यामुळे त्यांना परतायला उशीर झाला.

मनात जंगली जनावरांची भीती होती, बिबवेवडीच्या पुढे आल्यावर एक काळाकुट्ट प्राणी झाडीतून बाहेर आलेला झनके मास्तरांच्या नजरेस पडला. त्याचे डोळे चमकदार होते, मांजरासारख्या मिशा आणि जबड्यातुन बाहेर आलेले तीक्ष्ण दात, त्यामुळे बहुदा तो बिबट्या असावा असा अंदाज मास्तरांनी लावला. त्याला पाहिल्यावर झनके मास्तरांच्या पोटात भीतीचा गोळा आला त्यांनी स्कुटीचा वेग वाढवला, पण तो काळाकुट्ट प्राणी कितीतरी वेळ त्यांचा पाठलाग करत होता. त्या प्राण्यांचा पळण्याचा वेग मात्र बिबट्या प्रमाणे फार गतिमान नव्हता किंवा तो बिबटयाप्रमाणे चपळही नव्हता. तो मध्यम गतीने झनके मास्तरांच्या पाठीमागे येत होता पण त्यांची स्कुटर आणि त्याच्यात फार अंतर नव्हते. स्कुटरचा वेग जराही कमी झाला असता तरी त्या प्राण्याने त्यांना सहज गाठले असते. काही अंतरावर गावाची वेस (सीमा) जवळ आली आणि त्या प्राण्याचा वेग कमी झाला. तो प्राणी सीमेजवळ見 येऊन थांबला आणि मास्तर वेगाने स्कुटर चालवत वेसीपलीकडे गेले, पण तिथेच त्यांचा वाईट काळ सुरू झाला.

फुररर... फुररर... करत त्यांची स्कुटर गचके देत बंद पडली, आता गुरुजींचं काही खरं नव्हतं, त्यांनी भीतमय अंतकरणाने मागे वळून पाहिले तर तो प्राणी अजून वेसीपलीकडे उभा राहून त्यांच्याकडे पहात होता, ते तिथेच थबकले. त्यांनी पुन्हा गाडीला किक मारली पण गाडी स्टार्ट होत नव्हती. ते पुन्हा... पुन्हा... किक मारत गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होते पण व्यर्थ त्यांच्या प्रयत्नांना यश काही आले नाही. तो प्राणी लालबुंद चमकदार नजरेने त्यांच्याकडे पहात होता पण पुढे येत नव्हता. आपला काळ जवळ आला ह्या भीतीने त्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला, छाती धडधडायला लागली. त्यांची मागे त्या प्राण्याकडे पाहण्याची हिम्मत नव्हती, स्वतःला वाचवण्यासाठी त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी मागे वळून पाहिले. तेव्हा त्यांनी जे पाहिलं त्यामुळं त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, त्या प्राण्यामध्ये विचित्र बदल होत असल्याचे त्यांच्या नजरेस पडले आणि ते भीतीने तंतरले. हा प्राणी आज आपला काळ बनून आलाय याची त्यांना जाणीव झाली.

वेसीवर घडलेला थरार आणि अघटित बदल

तो प्राणी माणसासारखा दोन पायावर उभा राहिला आणि त्याने अस्वलासारखे रूप धारण केले, हे बदल होताना तो कांनठाळे बसवणारे हुंकार देत होता, मास्तरांना काही सुचेनासे झाले. उभा राहून तो अस्वलरूपी प्राणी जमिनीवर इतक्या जोराने पाय आपटत होता की भूकंप आल्याप्रेमाणे जामीनीला हादरे बसत होते. हा सर्व विचित्र प्रकार पाहून जीव वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून झनके मास्तरांनी गाडी तिथेच सोडली आणि सर्व शक्ती एकवटून पळायला सुरुवात केली. त्या प्राण्याच्या हुंकारण्याचा अवाज त्यांच्या कानठळ्या बसवत होता आणि त्याच्या पाय आपटण्याने जमिनीला हादरे बसत होते. काही अंतर पळत गेल्यावर त्यांना तो आवाज येणे बंद झाले आणि जमिनीला हादरे बासणेही थांबले, तेव्हा त्यांचा पळण्याचा वेग थोडा मंदावला.

त्याचवेळेस समोरून टॉर्चचा प्रकाश त्यांना दिसला आणि काही लोकांचा अवाज कानावर पडला तेव्हा दम लागल्याने ते पळायचे थांबले आणि मोठमोठी पावले उचलत चालायला लागले. ते घामाने पूर्ण डबडबले होते, शर्ट घामाने भिजला होता. त्यांनी एकवार थांबून मागे पाहिले तर तिथून त्यांना अंधारामुळे काहीही दिसत नव्हते. समोरून येणारे लोक जवळ आले आणि त्यांच्यावर टॉर्चचा उजेड पडला, ते गावातील लोक होते,

गावातील रहिवाशांमधील संवाद आणि चर्चा:

नांग्या: "अर मास्तरच हायेत आणि त्यांची ही अवस्था कशी झाली...? मास्तर... ओ मास्तर"

(ते गावातले लोक होते मास्तरांना यायला उशीर झाल्याने ते त्यांना शोधत आले होते.)

नांग्या: "मास्तर... वो मास्तर..."

(नांग्याच्या आवाजाने मास्तर थांबले, त्यांना धाप लागली होती, हातपाय थरथर कापत होते.)

मन्या: "ओ मास्तर काय झालं...? धावत का सुटलाय..."

(मास्तरांना बोलण्याचे त्राण नव्हते, ते फक्त कमरेवर हात ठेवून उभं राहून दम टाकत होते आणि हाताने खुणावत होते.)

रघु काका: "अरे त्यांना आधी दम खाऊ द्या... दमलेत ते आणि घाबरलेतही, मास्तर तुम्ही बसा आधी हित दगडावर"

रघु काकाने त्यांना हाताला धरून जवळ एका दगडावर बसवलं, मास्तरांनी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि स्थिरस्थावर झाल्यावर बोलायला लागले, मास्तर दम टाकत बोलत होते - "त्या... तिकडं कोणतरी भयानक प्राणी आहे... जो रूप बदलतो..."

मास्तरांच बोलणं ऐकून सगळेजण घाबरले. मन्या म्हणाला, "बापरे... म्हणजे असा कोण प्राणी हाय तो...?" मास्तर पुढे बोलू लागले, "मी माझ्या स्कुटरवरून येत होतो तेव्हा एक बिबटयासारखा दिसणाऱ्या प्राण्याने माझा पाठलाग केला आणि गावच्या वेसीवर आल्यावर तो थांबला, मी आपली वेस ओलांडली पण तो प्राणी वेसीपलीकд आला नाही. मी त्याच्याकडे पाहिले तर त्याने तिथे अस्वलासारखं रूप धारण केले. ते अस्वल हुंकारत होता आणि इतक्या जोराने जमिनीवर पाय आदळत होता की त्यामुळे जमिनीला हादरे बसत होते."

मास्तरांच बोलणे ऐकून घाबरलेला नांग्या म्हणाला, "ते कोण्ही जनावर नव्हतं... ही तीच पिसावळ होती." मास्तरांनी विचारले, "म्हणजे...?" नांग्या म्हणाला, "मास्तर ती मोठी कथा हाय... तुम्ही आधी घरी चला मग बोलू आपण...." मास्तरांना काळजी वाटली, "पण माझी गाडी..." भरतने विचारले, "कुठं हाय तुमची गाडी....?" मास्तर म्हणाले, "तिकडं वेसीपाशी..." नांग्या म्हणाला, "आता गाडी कशी आणायची...?" त्यावर भरत म्हणाला, "देवाचं नाव घेत कसतरी जाऊ आणि मास्तरांची स्कुटर तेवढी आणू, मास्तर आणि रघु काका तुम्ही इथेच थांबा..."

नांग्या, भरत आणि मन्या ही तरुण मंडळी होती तर रघु काका थोडे वयस्कर इसम होते. रघु काका म्हणाले, "देवाचं नाव घेत जा पोरानु... कुणाची हिम्मत होणार नाय तुमच्या जवळ यायची..." भरत म्हणाला, "हो काका..." आणि ते तिघे मास्तरांची स्कुटर आणायला गेले.

पोरं गेल्यावर रघु काका बोलत होते, "इतक्या रातीला ह्या वाटेला कधी येऊ नये मास्तर... अवो ही वाट लै वाईट हाय रातच्या येळला हितं काय अघटित घडल याचा नेम नाय..." मास्तरांनी सांगितले, "अहो सभा संपली आणि एका आजारी मित्राला बघायला गेलो म्हणून उशीर झाला यायला..." रघु काका म्हणाले, "फोन करून कळवायच तरी आम्हाला उशीर झालाय म्हणून आम्ही धाडलं असत तालुक्या परेन कुणालातरी तुम्हाला आणायला." मास्तर हताशपणे म्हणाले, "असं काय होईल ह्याची कल्पना नव्हती ना...!"

त्यांच्या गप्पा सुरु असताना ते तिघे गाडी घेऊन आले. भरतने विचारले, "मास्तर गाडी बंद पडली काय...?" मास्तर म्हणाले, "हो मी वेस ओलांडली आणि गाडी अचानक बंद पडली ती जुनी झाली ना आता..." रघु काका उद्गारले, "तुमचं नशीब वेस ओलांडल्यावर गाडी बंद पडली नायतर आज काय तुमचं खरं नव्हतं..." भरत म्हणाला, "बरं आता चला पटापट अकरा वाजून गेलेत मास्तर जेवल बी नसतील.... भूक लागली आसल त्याना." मास्तर म्हणाले, "भरत अरे त्या गाडीच्या डिकीत माझी पाण्याची बाटली आहे... तेवढं पाणी दे... खूप तहान लागल्याय..." भरतने मास्तरांची पाण्याची बाटली काढून दिली, मास्तरांनी पाणी प्याल्यावर ते घरच्या रस्त्याला लागले.

क्रमशः...

कथेचे विशेष टिपण:

सदर कथा, कथेतील पात्र आणि प्रसंग काल्पनिक आहेत. साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा. कथेचा उद्देश केवळ मनोरंजन आहे, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा उद्देश नाही. कथेचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत. (कथा प्रतिलिपि वरून साभार.)

© २०२६ | मनातल्या भावना | शेअर करायला विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad