Type Here to Get Search Results !

मराठी हृदयस्पर्शी कथा - स्वाभिमान | Emotional Story in Marathi - मराठी कथा

मराठी हृदयस्पर्शी कथा - स्वाभिमान  | Emotional Story in Marathi - मराठी कथा

काल संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतताना पुण्यातल्या एका प्रसिद्ध केक शॉपमध्ये थांबलो. कारण साधं होतं — बायकोचा वाढदिवस. दुकानात पाय टाकायला जागा नव्हती. एसीची थंड हवा, चॉकलेट-व्हॅनिलाच्या सुगंधाने भरलेलं वातावरण, काऊंटरवर उभे असलेले लोक ५००-१००० रुपयांचे फॅन्सी केक अगदी सहज ऑर्डर करत होते… जणू आनंद विकत घेणं फारच सोपं असावं.
 
मराठी हृदयस्पर्शी कथा - स्वाभिमान  | Emotional Story in Marathi - मराठी कथा
Marathi-emotional-katha

तेवढ्यात काचेचा दरवाजा अलगद उघडला. आत आले ते मध्यमवयीन काका. अंगावर सिमेंट-वाळू लागलेले मळकट कपडे, पायात फाटकी स्लीपर, आणि चेहऱ्यावर अशी एक लाज… जणू इथे येऊन त्यांनी काही मोठं पापच केलं आहे. ते बांधकाम मजूर आहेत, हे ओळखायला कुणाला विचार करावा लागला नाही. काही लोकांनी नाक मुरडलं. कोणी थोडं दूर सरकलं. सिक्युरिटी गार्ड संशयाने त्यांच्याकडे पाहू लागला.
मी नुसती नजर टाकून त्याला थांबवलं. काका काऊंटरपर्यंत गेले…

आवाज इतका हळू की ऐकायला कान टवकारावे लागले.
“साहेब… सगळ्यात स्वस्त केक कितीला आहे?”
सेल्समनने थंडपणे उत्तर दिलं,
“४०० पासून आहेत काका. पेस्ट्री ५० रुपयाची.”
काकांनी खिशात हात घातला.
१०-२० रुपयांच्या चुरगळलेल्या नोटा, काही चिल्लर…
थरथरणाऱ्या हातांनी मोजायला लागले.
त्या हातांमध्ये आयुष्यभराची मेहनत होती, पण आज ती अपुरी पडत होती.
पैसे कमी पडले.
डोळे खाली घालून, ओठ थरथरत त्यांनी म्हटलं,
“नको साहेब… तो ४०० वाला नको. ५० रुपयाची एक वडी द्या.
आज पोरीचा वाढदिवस आहे.
फक्त मेणबत्ती लावून कापायचा आहे…
चव तीच असते ना?”
ते वाक्य ऐकून…
माझ्या छातीत काहीतरी तुटलं.
ज्या बापाकडे पूर्ण केक घ्यायची ऐपत नाही,
तो स्वतःचा स्वाभिमान गिळून
मुलीच्या हसण्यासाठी एका तुकड्यावर समाधान मानतोय.
आपण हजारो रुपये पार्टीत उधळतो,
आणि कुणासाठी तरी केकचा एक तुकडाही स्वप्न असतो.
मी पुढे गेलो.
सेल्समनला थांबवलं.
“डिस्प्लेमधला तो छानसा चॉकलेट केक द्या.
आणि एक मोठा चॉकलेट बॉक्सही.”
काका घाबरले.
डोळ्यांत भीती.
“साहेब… माझ्याकडे एवढे पैसे नाहीत.”
मी त्यांचे हात पकडले.
त्या हातांमध्ये कष्टाची जखम होती.
“काका, पैसे नको.
हे तुमच्या पोरीसाठी माझ्याकडून गिफ्ट आहे.
तिला सांगा… एका मोठ्या भावाने पाठवलंय.”
तो केक हातात येताच
त्या राकट, कडक दिसणाऱ्या मजुराच्या डोळ्यांतून
घळाघळा अश्रू वाहू लागले.
ते माझे पाय धरायला आले.
मी त्यांना घट्ट मिठी मारली.
जाताना फक्त एवढंच म्हणाले,
“साहेब… आज पोरीकडे रिकाम्या हाताने जावं लागेल
असं वाटत होतं.
पण आज देवच भेटलात.”
ते गेले…
पण माझ्या मनात काहीतरी कायमचं बदलून गेले.
महागाई कितीही वाढो,
बापाचं प्रेम कधीच महाग होत नाही.
फक्त कधीकधी परिस्थितीसमोर
ते हतबल होतं… आणि मुकं राहातं.
कपड्यांवरून, चेहऱ्यावरून
कुणाची किंमत ठरवू नका.
कधी कधी फाटलेल्या खिशातच
जगातलं सगळ्यात श्रीमंत प्रेम दडलेलं असतं.
जिथे शक्य असेल तिथे
कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणा.
तो आनंद पैशात मोजता येत नाही…
तो लाखमोलाचा असतो.
 
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व वरून साभार .....

अशाच कथा ऐकण्यासाठी ब्लॉग SUBSCRIBE करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad