Type Here to Get Search Results !

देव दिवाळी कशी साजरी करतात? काय असतो नैवैद्य ? देव दीपावली माहिती

 
देव दिवाळी कशी साजरी करतात? काय असतो नैवैद्य  ? देव दीपावली माहिती

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस 'देवदिपावली' किंवा 'देवदिवाळी' हा सण येतो. यंदा २१ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरू होत आहे. या मासाचा पहिला दिवस प्रतिपदेचा, तोच देव दिवाळी म्हणून साजरी केला जातो. हा सण मुख्यत्वे कोकणप्रांतीय लोकांमध्ये साजरा केला जातो. आपण जेव्हा अश्विन-कार्तिक महिन्यांमध्ये दिवाळी साजरी करतो, तेव्हा चार्तुमास सुरू असतो. भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात. त्यावेळी चार्तुमासही संपतो. म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने सर्व देवदेवतांचे स्मरण हा देवदिवाळी सणाचा हेतू असतो.
 
उत्तर भारतीय लोक त्रिपुरी पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करतात, कारण त्यांच्या पंचांगानुसार पौर्णिमेनंतर नवा महिना सुरु होतो. त्यांचा मार्गशीर्ष महिना सुरु होऊन पंधरा दिवस झाले. पण महाराष्ट्र आणि जवळच्या भागात जे पंचांग वापरले जाते, त्यानुसार अमावस्येनंतर येणारा दिवस नव्या महिन्याचा पहिला दिवस मानला जातो. त्यानुसार २१ नोव्हेंबर रोजी आपल्या इथे कार्तिक मास संपून मार्गशीर्ष (Margashirsha Maas 2025) मास सुरु होत आहे आणि त्याचा पहिला दिवस देव दिवाळी (Dev Diwali 2025) म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. त्याबरोबरच मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी खंडोबाचे नवरात्र (Khandobache Navratra 2025) साजरे केले जाते. त्याची माहिती इतर लेखात दिलेली आहेच, तूर्तास देव दिवाळी का आणि कशी साजरी करावी ते जाणून घेऊ.
 
 

देव कोणकोणते?

आपल्याकडे तेहेतीस कोटी देव अशी संकल्पना आहे. यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृतातील आहे. संस्कृत भाषेत कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे. ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार सोपवला. त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत. प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले. असे एकूण ३३ प्रकार झाले, त्याला तेहेतीस कोटी देव संबोधण्यात आले. अशा सर्व देवांचे स्मरण म्हणजे देवदिवाळी! ते नाही तर निदान आपल्या देव्हाऱ्यातील देवांचे, कुलदेवांचे, ग्रामदेवतेचे स्मरण अवश्य करावे.
 
देवदीपावलीचे वेळी देव्हाऱ्यात तेलातुपाचे दिवे लावून ठेवावेत. देव्हाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे. या दिवशी घरातील कुलदेवता व इष्टदेवता यांच्याखेरीज स्थानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता. उदा. महापुरुष, वेतोबा, उपदेवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो. या सर्व देवदेवतांची वर्षातून आपल्याकडून एखादे दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक असते, म्हणून कोकणप्रांतीय लोक देवदिवाळीस 'देवांचे नैवेद्य' म्हणतात. 
 
 

देवदिवाळीला करा 'हा' नैवेद्य :

सद्यस्थितीत घरात विविध तळणीचे जिन्नस करून त्यांच्या सेवनाने हा विधी साजरा केला जातो.
देवदीपावलीत आपापल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थांखेरीज ताटात पुरणाचे कडबू, भरड्याचे वडे, सांज्याचे घारगे, अळणी वडे, घावन-घोप्टेले यातील पदार्थ नैवेद्यास ठेवतात. त्यापैकी एक नैवेद्य घरात घेतला जातो व एक नैवेद्य बाहेर कामकरी लोकांना दिला जातो. देवदीपावलीच्या निमित्ताने घरातील, गावातील व घराण्यात पूर्वापार चालत आलेल्या सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदरसत्कार देवदीपावलीला केला जातो.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.