Type Here to Get Search Results !

स्वामी समर्थ प्रकट दिन कथा - स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची कथा

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकटदिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते. महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत. श्री स्वामी समर्थांचा 23 मार्च रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे. त्या निमित्तानं स्वामींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात. त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घ काळ वास्तव्य केले होते. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार म्हणून ओळखले जातात. 
 
गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. 1459 मध्ये माघ वद्य 1 शके 1380 रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. यानंतर ते शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळीवनात अदृश्य झाले. याच वनात त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी एक लाकूडतोड्या वनात आला. लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली. यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला. त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली.
 
 हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूडतोड्या घाबरला होता. मात्र, स्वामींनी लाकूडतोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले. देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले, असे सांगितले जाते.
स्वामी समर्थ प्रकट दिन कथा - स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची कथा
swami samarth photo
 
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली, असे सांगितले जाते. नंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले. त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले. 
 
श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना सुद्धा दीक्षा दिली. पुढे 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला. तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. स्वामींनी 1878 मध्ये अवतार संपविल्याचे दाखवले. पण, प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत, असे सांगितले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.