कोकणातील सांस्कृतिक परंपरा जपणारा ‘शिमगोत्सव’...
कोकणात होळी या सणाला ‘शिमगा’ असं म्हणतात. शिमगा हा सण कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणारे सण म्हणजे गणेशोत्सव आणि शिमगा. म्हणूनच गणेशोत्सवानंतर प्रत्येक कोकणी माणूस शिमग्याची आतुरतेने वाट पाहत असतो. कोकणात हे दोन्ही सण मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. या सणांसाठी सर्वच चाकरमानी आवर्जून गावी जातात. ज्यामुळे या सणांना कोकणातील प्रत्येक घरात उत्सवाचे वातावरण असते. एरव्ही फक्त एक दोन माणसं असलेली कोकणातील घरं सणासुदीला आनंदाने भरून वाहतात. म्हणूनच शिमगोत्सवाविषयी सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे.
कसा साजरा केला जातो कोकणात ‘शिमगा’...
कोकणात होळीच्या सणाला एक वेगळाच रंग असतो. होळीच्या दिवशी पहाटे ग्रामस्थ एकत्र येऊन होलिकादहन करतात. त्यानंतर जवळजवळ आठवडाभर गावोगावी पालखीचा उत्सव साजरा करण्यात येतो. गावागावातून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानूवर्ष ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणाचाराला येतात असं कोकणात मानल जातं. घरोघरी ग्रामदेवता घरात येणार याचा आनंद काही औरच असतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पुजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणे हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो. हा उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातील पाहुणेमंडळीदेखील कोकणात येतात. कारण पालखी नाचवताना पाहणे हा डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण असतो. यासाठी अनुभवी ग्रामस्थ डोक्यावर पालखी घेऊन बेभान होऊन नाचतात. गावाच्या वेशीवर आजूबाजूच्या गावातील ग्रामदेवता एकमेकींना भेटण्यासाठी येतात. यावेळी पालखी नाचवताना त्या एकमेकींची ओटी भरतात असं म्हटलं जातं. यासाठी पालखी नाचवताना पालख्यांमधील ओटीचे खण-नारळ बदलण्यात येतात. कोकणवासियांसाठी हा क्षण असविस्मरणीय असतो. पालखी नाचवण्याचा प्रकार प्रत्येक गावाच्या परंपरेनुसार निरनिराळा असतो. त्यामुळे पालखी नाचवताना पाहण्यासाठी प्रत्येत गावचे ग्रामस्थ इतर गावांमध्येदेखील जातात. काही ठिकाणी या निमित्ताने दशावतार, सिनेमा, भजन -किर्तन अशा मनोरंजक गोष्टींचे आयोजन केले जाते.
शिमगा साजरा करण्यामागचा हेतू...
होळी अथवा शिमगा फाल्गुन महिन्यात येतो. हा काळ कोकणातील शेतकऱ्यांसाठी निवांत असण्याचा काळ असतो. कारण या काळात कोकणातील शेतीची सर्व कामं संपलेली असतात. शेताची भाजवणी करून पेरणीसाठी शेत तयार करून ठेवलं जातं. जुन-जुलैला पावसाच्या आगमनानंतर पेरणी केली जाते. तोपर्यंत शेतकरी निवांत असतो. म्हणूनच पूर्वी कोकणात शिमगा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. शिवाय कोकणात विविध देवतांची मंदिरे आहेत. या निमित्ताने ग्रामदेवतांची पालखी काढून, पुजा-अर्चा करून सण साजरा केला जात असे. जरी आज कोकणातील शेतीचे प्रमाण आणि स्वरूप पूर्वीप्रमाणे राहिलेलं नसलं तरीदेखील या सणाला तितकाच उत्साह आजही गावोगावी असतो.
कोकणवासियांसाठी दोन क्षण सुखाचे...
गावाबाहेर गेलेल्या चाकरमान्यांना होळीमुळे चार दिवस घरी जाता येतं. खरंतर कोकणातील गावाबाहेर राहणाऱ्या लोकांना गावी जाण्यासाठी संधीच हवी असते. निसर्गाची साथ, आंबा-पोफळीच्या बागा, अथांगसमुद्रकिनारे अशा वातावरणात जायला कोणाला आवडणार नाही. सहाजिकच गावी जाण्यासाठी या दोन सणांचं कारण कोकणवासियांना पुरेसं असतं. या निमित्ताने धावपळीच्या काळात थकलेल्या जीवांना विसावण्याचं एक निमित्त मिळतं. ग्रामस्थही या काळात आपापसातील भांडण, तंटे विसरून एकत्र येऊन सणाचा आनंद लुटतात. शिमग्याचं सोंग, बोंबा मारणं, दशावतार अशा गोष्टींमुळे गावी वातावरणात एक वेगळाच उत्साह ओंसडून वाहत असतो.